पोटाचे विकार (अम्लपित्त, यकृत् विकार, ग्रहणी, इ.) – आयुर्वेदीय उपचार

पोटाचे विकार (अम्लपित्त, यकृत् विकार, ग्रहणी, इ.) – आयुर्वेदीय उपचार

आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावताना लोकांना वेळेची कमतरता भासते. त्यामुळे अवेळी-अनियमित-अयोग्य पद्धतीने अन्नसेवन करणे, रात्री जागरण, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव यासारख्या चुकीच्या सवयी सर्रास आढळतात. तसेच, आहारामध्ये फास्ट फूड, जंक फूड, आंबवलेले पदार्थ, शिळे अन्न, विभिन्न कृत्रिम पेय-शीतपेयांचा अतिरिक्त वापर यांचेही प्रमाण वाढत असल्याचे आढळून येत आहे. विशेषतः मधयमवयीन व तरुण वर्गामध्ये अशा पद्धतींचा वापर अधिक प्रमाणात आढळून येत आहे.

आयुर्वेदशास्त्रानुसार अन्नसेवन करीत असताना ‘तन्मना भुञ्जीत्’ अर्थात् जेवणामध्ये पूर्णतः मन लावून आहारसेवन करावे असे सांगितले आहे. परंतु, विभिन्न करमणुकींच्या (टी.व्ही., मोबाईल, कॉम्प्युटरसारख्या) साधनांचा वापर तसेच मानसिक तणाव अश्या कारणांमुळे आहारसेवनाच्या योग्य नियमांचा दैनंदिन जीवनात अभावच अधिक आढळतो.

मानसिक ताणतणाव, चिंता यांमुळे रात्री जागरण, अनिद्रा या समस्या उत्पन्न झाल्याने खाल्लेल्या आहाराचे योग्य पचन होत नाही. तसेच वरील चुकीच्या आहाराच्या सवयींमुळेही पोटातील अग्नीचे कार्य मंदावते व घेतलेला आहार नीट पचत नाही. तसेच अतिप्रमाणात आंबट, तिखट, व चमचमीत पदार्थांचे अधिक प्रमाणात सेवन केल्यानेही अम्लपित्तासारखे विकार उत्पन्न होताना दिसून येतात. त्यामुळे भूक न लागणे, पुन्हा अपचन, आंबट-करपट ढेकर, गॅसेस, मळमळ, छातीत-पोटात-घशात जळजळ, डोकेदुखी, पोटदुखी, उलटी / जुलाब, ताप, थकवा, इ. यांसारखी लक्षणे उत्पन्न होऊ शकतात.

आहारपचनामध्ये विकृती निर्माण झाल्याने शरीराचे योग्य पोषण होत नाही. तसेच दीर्घकालीन व वारंवार उत्पन्न होणाऱ्या तक्रारींचा गंभीर परिणाम पोटातील तसेच शरीरातील इतर अवयवांवरही होऊ शकतो. यातूनच कावीळ, जलोदर इ. यकृताचे विकार, व्रण (अल्सर), संग्रहणी, कोलायटीस सारखे आतड्यांचे विकार, मूळव्याध इ. अनेक रोग निर्माण होतात. हे सर्व टाळण्याकरीता पोटाच्या तक्रारींवर आयुर्वेद उपचार पद्धती प्रभावी ठरू शकते.

पोटाच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केल्याने शरीरातील अग्नि सुधारून पचन सुधारते, योग्य रीतीने खाल्लेले अन्न अंगी लागते व शरीराला बळ मिळते.

पोटाचे विकार (अम्लपित्त, यकृत्-विकार, अपचन, इ.) व यावरील आयुर्वेदीय उपचार याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी गेली २५ वर्षे आयुर्वेद चिकित्सक म्हणून डोंबिवली येथे कार्यरत असलेले सुप्रसिद्ध आयुर्वेद-तज्ज्ञ डॉ. महेश ठाकूर यांच्याशी संवाद साधणार आहेत सुप्रसिद्ध सूत्रसंचालक डॉ. महेश चिटणीस.

डॉ. महेश ठाकूर सर्व प्रेक्षकांना एकच सल्ला देऊ इच्छितात की, ‘पोटाच्या विकारांवर वेळीच उपचार घ्या व गंभीर उपद्रवांना दूर ठेवा.’

Share: 

Leave a Reply
Menu